नमस्कार, कै.ह.भ.प.रामचंद्र पाटलू चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, वारजे तर्फे आपले आमच्या ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत

Thursday, September 30, 2021

१ ऑक्टोबर - रक्तदान दिन

 


रक्तदान आहे जीवनदान,
ते वाचवते दुसर्याचे प्राण

रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बॅंकांचा सहभाग असतो.


बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो.

  • अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  • महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते.
  • मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.

     ब्लड बॅंकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते.

रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.

  • भारत देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते.
  • रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.
  • भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात.
  • रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे

    1. वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत)
    2. वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..
    3. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास
    4. रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास
    5. निरोगी माणसाला दर ३ महिन्यांनी जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.


    रक्तदान कोण करू शकत नाहीत

    1. रक्तदात्याने आधीच्या ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतलेले असल्यास.
    2. रक्तदात्याला मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
    3. रक्तदात्याला मागील १ वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास.
    4. ६ महिन्यापूर्वी त्याची मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.
    5. गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.
    • ब्लड प्रेशर लो किवा हाय असणाऱ्यांनी रक्तदान करताना रक्तदाबाची चाचणी करून पहावी.
    • उपाशीपोटी किवा खाऊन झाल्यावर अर्धा-तासापर्यंत रक्तदान करू नये.
    • इतरही आजारांची चाचणी करून घ्यावी.

    कायमचे बाद रक्तदाते

    • कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, कावीळ (ब, क प्रकारची), एड्स, मूत्रपिंड रोग, गुप्त रोग, यकृताच्या व्याधी असलेले.

    रक्तदानाचे फायदे

    1. रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब, क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.
    2. रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.
    3. बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
    4. नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.
    5. नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात.

No comments:

Post a Comment